जा आणि जिंकून ये म्हणून प्रेरणा देणारी “आऊ”

शेवटी विजय सत्याचाच!

जयसिंगपूर : डॉ.महावीर अक्कोळे

शेतकऱ्याच्या घामाच्या कमाईतल्या हक्काचा वाटा अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेराजू शेट्टी नावाच्या एका धगधगत्या अंगाऱ्याने आपल्या हजारो शिलेदारांच्या अथक आंदोलनातून मिळवलाच! मोर्चे, निवेदने, ५२२ किलोमीटरची उन्हातान्हातून अवकाळी पावसातून केलेली पावलांना फोड आणणारी पायपीट,

राज्यभरातून आलेल्या हजारो स्वाभिमानी शिलेदारांचा नांदणी गावच्या तमाम ग्रामस्थांनी अत्यंत आपुलकीने जेवणखाण देऊन केलेला पाहुणचार, जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावर झालेली विराट ऐतिहासिक ऊस परिषद, सारे जग दिवाळी साजरी करीत असताना रस्त्यावर काढलेली “ठिय्या आंदोलन दिवाळी”,

साखर सम्राटांच्या काळजाला पाझर फुटावा यासाठी शेतकरी भावाबहिणींनी काळजावर दगड ठेवून त्यांच्या दारात केलेले खर्डा-भाकरी आंदोलन, शेतकरी बहिणींनी साखर सम्राटांकडे केलेली भाऊबीजेची याचना एवढे सगळे झाले

तरी पत्थरदिल साखर सम्राटांच्या कोडग्या कठोर काळजावर किंचितही ओरखडा उठला नाही ! शेवटी,’ नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही’या न्यायाने,लोकांना थोडा त्रास होणार हे माहित असूनही, अत्यंत क्षुब्ध, निराश, तरीही स्थिर मनाने पुणे- बेंगलोर हायवेवर चालू केलेले बेमुदत “चक्काजाम आंदोलन” !! कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः येऊन राजू शेट्टींची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.

अखंड ९ तासांचा चक्काजाम चालू असताना मात्र वेगाने घडामोडी घडल्या आणि अखेर मागील हंगामातील शंभर आणि पुढील हंगामातील पहिली उचल किमान एकतीसशे ही ऊस उत्पादकांची मागणी साखर कारखानदारांना मान्यच करावी लागली. राजू शेट्टींच्या आणखी एका ऐतिहासिक आंदोलनाचा विजयी समारोप झाला!

या आंदोलनादरम्यान सुप्रसिद्ध साहित्यिक राजन गवस सरांनी फेसबुकवर टाकलेली एक पोस्ट मला आठवली. त्यात त्यांनी लिहिले होते, “राजू शेट्टी, ज्यांना नाकही नाही आणि तोंडही नाही … त्यांचे तुम्ही काय दाबणार आणि काय उघडणार ❓” साखर सम्राटांची पराकोटीची असंवेदनशीलता सरांना कदाचित अधोरेखित करावयाची असावी.

या आंदोलनात काही गोष्टी अगदी स्पष्टपणे द्दृगोचर झाल्या. काही साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक करतात. काटा तर मारतातच, पण काटा मारुन, रिकव्हरी चोरुन उत्पादित केलेली साखर परस्पर विकून ते काळा पैसा सुद्धा तयार करत असावेत. हाच पैसा निवडणुकीत वापरला जात असावा.

काही कारखानदारांची दुसरा हप्ता देण्याची इच्छा असतानाही काही कारखानदार त्यांच्यावर न देण्यासाठी दबाव टाकत असावेत. अगदी शेवटी का असेना मध्यस्थांच्या, प्रशासनाच्या, पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत दत्तच्या गणपतराव दादांनी ही कोंडी फोडली. गणपतरावदादांच्या पुढाकाराला दाद तर द्यायलाच हवी!

खरे श्रेय द्यायला पाहिजे ते राजू शेट्टींच्या कणखर, संयमी नेतृत्वाला, आणि धीर न सोडता त्यांना साथ देणाऱ्या खास करून तरुण… तेजतर्रार स्वाभिमानी शिलेदारांना !!
आता ऊस कोणाला द्यायचा तेही आपणच ठरवूया आणि शेतकऱ्यांच्या जीवावर साखर कारखाने चालवून उन्मत्त राजकारण करणाऱ्यांना कसे वठणीवर आणायचे तेही ठरवूया!

आणखी एक उल्लेख केल्याशिवाय हे लेखन पूर्ण करता येणार नाही. अगदी आजारी असताना सुद्धा, ऐन दिवाळीत रस्त्यावर लढायला निघालेल्या आपल्या मुलाला न थांबवता, उलट जा आणि जिंकून ये म्हणून प्रेरणा देणारी “आऊ” सुद्धा जगावेगळी, असामान्य आणि अलौकिकच!!

पतीच्या प्रकृतीची प्रचंड काळजी मनात बाळगता बाळगता त्यांना मनापासून साथ देणाऱ्या शेट्टी वहिनीच्या धैर्याला सुद्धा सलामच केला पाहिजे!! सगळ्या, सगळ्या, सगळ्या आबालवृद्ध स्वाभिमानी शेतकरी भावाबहिणींना लवून सलाम!!
हीच एकजूट कायम ठेवून चोवीस चे मैदान सुद्धा मारुया भावाबहिणींनो…!! मारुया ना?

Spread the love
error: Content is protected !!