बाबुराव धनवडे पतसंस्थेच्या निवडणुकीत नृसिंहवाडीच्या धनवडे गटाची बाजी
डॉ.प्रवीण धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा धुव्वा..
नृसिंहवाडी / प्रतिनिधी
येथील बाबुराव धनवडे ग्रा.बि.शे.सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सागर धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्था बचाव पॅनेलने सर्वच्या सर्व १० जागांवर विजय मिळवला आहे.यानिमित्ताने नृसिंहवाडीतील धनवडे गटाला राजकीय संजीवनी मिळाली असून सोसायटीनंतर पतसंस्था परत मिळवण्यात त्यांना यश आले आहे.
बाबुराव धनवडे पतसंस्थेची निवडणूक धनवडे कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची बनली होती.सागर धनवडे, अनंत धनवडे, प्रताप धनवडे यांचे पतसंस्था बचाव पॅनेल तर डॉ. प्रवीण धनवडे, प्रशांत धनवडे यांचे स्व. प्रकाश धनवडे पॅनेल अशी थेट लढत होती. धनवडे विरुद्ध धनवडे असा संघर्ष शिगेला पोहोचला होता. यात नेमके कोणते धनवडे विजयी होतात? याकडे गावाचे लक्ष लागून राहिले होते. 855 पैकी 469 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज झालेल्या मतमोजणीत सभासदांचा कौल नृसिंहवाडीतील धनवडे गटाकडे असल्याचे चित्र स्पष्ट झाले. सोसायटीनंतर पतसंस्थेची सत्ता हातून गेल्याने डॉ. प्रवीण धनवडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर अनंत धनवडे समर्थक गटात चैतन्याचे वातावरण आहे. यावेळी बोलताना सागर धनवडे म्हणाले, “सभासदांनी संस्थेचे हित पाहून मतदान केले होते. त्यामुळे आम्हांला विजयाची खात्री होती. संस्थेच्या अडीअडचणी सोडवून गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.” दरम्यान विजयी उमेदवारांनी जल्लोषी मिरवणूक काढत दत्तदर्शन घेतले. विजयी उमेदवारांना दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे आदींनी शुभेच्छा दिल्या.
विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे – आनंदा आडसुळ (242), संतोष गायकवाड (238), गुरुप्रसाद धनवडे (248), सागर धनवडे (250), अजित पाटील (232), दत्तात्रय भोसले (239), संतोष मुळे (239), उज्वला धनवडे (243), सुश्मिता धनवडे (251), श्रीनिवास कांबळे (246), जयवंत पतंगे – (बिनविरोध).