स्व. आपगोंडा कलगोंडा पाटील स्मरणार्थ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
नांदणी / प्रतिनिधी
आज लहान मुले इतकी मोबाईलच्या आहारी गेली आहेत भविष्यात या मुलांचा मोबाईलचा नाद सोडवण्यासाठी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरु होतील असे प्रतिपादन युवा व्याख्याते, लेखक, विचारवंत व साहित्यिक प्रा. गणेश शिंदे यांनी नांदणी येथील स्व.आपगोंडा कलगोंडा पाटील यांचे स्मरणार्थ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.
या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात यावेळी दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ तालुका मागासवर्गीय सह. सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन दलितमित्र डॉ. अशोकराव कोंडिबा माने यांना ‘आदर्श समाजसेवक व नांदणीतील प्रगतशिल शेतकरी भूपाल बाबु संभूशेटे
यांना’ नांदणी कृषिभूषण 2023’या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त पशुधन पर्यवेक्षक डॉ. भीमराव गणपतराव पाटणकर यांचा ‘विशेष सन्मानाने ‘ गौरव करण्यात आला.व्याख्यानात पुढे गणेश शिंदे म्हणाले मनोज पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ चालू ठेवलेला पुरस्काराचा उपक्रम अतिशय
अप्रतिम व आदर्श असून मनोजने आपल्या मातीशी आपली नाती घट्ट जोडली आहेत यातच मनोजच्या आदर्श कर्तूत्वाची कल्पना येते. आज माणसाने निसर्गासोबत जुळवून घेत निसर्ग संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे.यावेळी पुरस्काराला उत्तर देताना अशोकराव माने
म्हणाले आपल्या मातीतील ताकद व शक्ती देणारा हा पुरस्कार फारच अनमोल असून वडिलांच्या स्मृतीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे अखंड काम करणारा मनोज सारखा माणूस आपण कोठेच पाहिला नाही. भूपाल संभूशेटे यांनी या पुरस्काराने आपल्या कष्टाचे खरे
चीज झाले असे सांगितले. भीमराव पाटणकर म्हणाले या पुरस्काराने आपल्या 54 वर्षाच्या पशुधन सेवेचे सोने झाले. समाजासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा यथोचित सन्मान करणे हाच या पुरस्कारामागचा निस्वार्थी उद्देश असल्याचे अॅड. मनोज पाटील यांनी
सांगितले. यावेळी सातगोंडा कलगोंडा पाटील व आदगोंडा कलगोंडा पाटील यांचाही यथोचित्त कौटुंबिक सन्मान करण्यात आला. प्रा. गणेश शिंदे यांच्या शुभहस्ते, नेमिनाथ जुगळे (गुरुजी) यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,मा.खा.राजू
शेट्टी, मा. आ.उल्हास पाटील, व गणपतराव (दादा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात , विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा नांदणी
हायस्कूल नांदणी येथे संपन्न झाला, कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक अण्णासाहेब क्वाणे यांनी केले, सुभाष पाटील यांनी आभार मानले तर बबन यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.