कोल्हापूर / प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा (मर्या.) मार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2023-24 या वित्तीय वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येत असून जास्तीत जास्त विद्यार्थी व समाज बांधवांसाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.सन 1993-94 पासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ हे राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ, दिल्ली (NSFDC) यांची अधिकृत वाहीनी म्हणून कार्यरत आहे. सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येणार असून योजनेचे स्वरुप
खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक कर्ज योजना
कर्जाची मर्यादा देशांतर्गत शिक्षणासाठी रक्कम रु.30 लाखपर्यंत,परदेशांतर्गत शिक्षणासाठी रक्कम रु.40 लाखापर्यंत आहे.वित्त उपलब्धी- महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी एनएसएफडीसी यांचेकडून उपलब्ध करुन देण्यात येतो. उत्पन्न मर्यादा ग्रामीण, शहरी भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रक्कम रु.3 लाखापर्यंत असावे. एनएसएफडीसीचे माहिती पुस्तिकका दिनांक 1 ऑक्टोबर 2023 नुसार देशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी महिला लाभार्थींसाठी रु.5.5 टक्के व्याजदर द.सा.द.शे. व पुरुष लाभार्थींसाठी रु. 6 टक्के द.सा.द.शे. व्याजदर आकाराण्यात येईल. परदेशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी महिला लाभार्थींसाठी रु.6.5 टक्के व्याजदर द.सा.द.शे. व पुरुष लाभार्थींसाठी रु.7 टक्के द.सा.द.शे. व्याजदर आकाराण्यात येणार आहे. रक्कम रु.10 लाखापर्यंतचे कर्ज परतफेडीचा कालावधी 10 वर्षाचा असेल व रक्कम रु.10 लाखापेक्षा जास्तीचे कर्ज परतफेडीचा कालावधी 12 वर्षाचा असेल. शिक्षण पूर्ण होऊन 6 महिन्यांनी किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईल तेव्हापासून या कर्जाच्या परतफेडीची सुरुवात होईल. या योजनेच्या यापूर्वी असलेल्या नियम व अटी लागू राहतील.