श्री दत्त प्रभूंची पुण्य तपोभूमी : श्री क्षेत्र नरसोबावाडी

नृसिंहवाडी / दर्शन वडेर
भगवान श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबावाडी येथे आज सायंकाळी पाच वाजता ‘श्रीं’चा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. अवघ्या आसमंतात दत्तनामाचा गजर सुरू असून महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,आंध्रप्रदेशसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक नृसिंहवाडीत येत आहेत.’अवघे गरजे कृष्णातीर..’अशी अनुभूती देणाऱ्या दत्तजयंती सोहळ्यामुळे नृसिंहवाडीत भक्तीरसाला उधाण आले आहे.त्यानिमित्त…
धन्य कृष्णातीर l धन्य औदुंबर l
जेथे दत्तात्रेय l यतिरूपे l l
कृष्णा-पंचगंगा संगमाचा परिसर हा अनादी काळापासून वृक्षवल्लींनी दाटलेला होता.या संगमाला दत्तगुरूंचे द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा दिव्य अनुग्रह घडला.गुरुरायांच्या पदस्पर्शाने या भूमीचे भाग्य उजळले आणि भक्तीरसाची मुक्त उधळण होऊ लागली.इ. स.१४२२ ते १४३४ या काळात महाराजांचे वास्तव्य येथे होते.बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर स्वामींनी औदुंबर वृक्षाखाली पादुकांची स्थापना केली. लोकोद्धरासाठी आपले निरंतन वास्तव्य येथे असेल,असे वचन चौसष्ट योगिनींना दिले.पुढे या क्षेत्राचा महिमा अनेक संत-विभूतींनी प्रेमभराने गायला.रामचंद्र योगी, प.पू.नारायण स्वामी,गोपाळ स्वामी महाराज अशा सिद्ध साधकांनी या भूमीतच समाधी अवस्था धारण केली.आणि हे पावन क्षेत्र नृसिंहवाडी म्हणून लौकिकास आले.काही ठिकाणी नृसिंहवाटिका,नरसोबावाडी असेही नामोल्लेख आढळतात.विजापूरच्या इब्राहिम आदिलशहाने कन्येचे अंधत्व दूर झाल्याने हे दत्त मंदिर बांधून दिल्याचा उल्लेख आढळतो.मंदिरासमोरील दगडी घाट हा संत एकनाथ महाराजांनी बांधून घेतला आहे.सद्गुरू गुळवणी महाराजांनी विस्तीर्ण सभामंडपाचे बांधकाम करून दिले आहे.स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.’श्री’पादुकांच्या नित्यपूजेचे दायित्व स्वतः नृसिंहसरस्वती स्वामींनी भैरंभट जेरे यांना दिले होते. सहाशे वर्षांपासून आजतागायात पुजारी कुटुंबाकडून सेवा अविरत सुरू आहे.कोणत्याही आपत्तीत खंड पडलेला नाही.मौनी स्वामी महाराज, प.पू.टेंबे स्वामी,दीक्षित स्वामी,कृष्णानंद स्वामी,ब्रह्मानंद स्वामी,महादबा पाटील महाराज,यती महाराज यांच्या सहवासाने या क्षेत्राचे भक्तीमहात्म्य सर्वदूर पोहचले आहे. कृष्णा नदी ही साक्षात विष्णूरूपिनी आहे.वेण्णा आणि कोयना या नद्या ब्रह्मा आणि शिवाची जलप्रतीके आहेत.त्यांच्या संगमाने पुढे वाहणारा प्रवाह हा प्रत्यक्ष दत्तप्रभूंचे जलस्वरुप आहे.आणि या जलस्वरूप दत्ताचे हृदयस्थान हे “पुण्यभूमी नृसिंहवाडी” आहे.असे यथार्थ वर्णन प. पू. टेंबे स्वामींनी केले आहे.गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेद मानला जातो.गुरुचरित्राच्या १८व्या अध्यायात नृसिंहवाडीचे महात्म्य काशी-प्रयागाइतके असल्याचे सांगितले आहे.दत्त मंदिरात पहाटेपासूनच नित्यक्रमाला सुरुवात होते.भूपाळी,काकड आरती आणि वेदमंत्रांच्या स्वरांनी परिसरात चैतन्य निर्माण होते. मनोभावे अभिषेक व लघुरुद्र सेवा केल्यानंतर दुपारी बारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा संपन्न होते. मंदिरात दिवसभर ब्रह्मवृंदाकडून गुरुचरित्र पारायण, पुरुषसूक्त,श्रीसुक्त यांची आवर्तने सुरू असतात.जस जसा सूर्य मावळतीला झुकतो तशी लगबग सुरू होते ती पालखीची! धूप दीप व आरती झाल्यानंतर उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होते.आणि ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा..’,’शांत हो श्री गुरुदत्ता..’अशा पदांच्या गायनाने एक वेगळाच साज चढतो. शेजारतीनंतर मंदिर बंद होते आणि ‘आता सुखे निद्रा करा’ या भावनेने पुजारी मंडळी घरी परततात.आता या भक्तीने ओतप्रोत असणाऱ्या दिनक्रमात भर पडणार आहे ती दत्त जन्मोत्सव सोहळ्याची! आज मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी ५ वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात दत्तगुरुंचा जन्मकाळ उत्सव संपन्न होईल. ‘उद्धरी गुरुराया.. अनुसया तनया’ हा पाळणा गायला जाईल आणि अबीर गुलालाच्या उधळणीने आसमंतात दत्तजन्माचा आनंद दाटून येईल.सोहळ्यानंतर यंदाचे मानकरी वासुदेव पुजारी यांच्या घरी श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवला जाणार आहे. अवघ्या चराचराला व्यापून उरणार्या दत्तगुरुंची राजधानी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.अन् मनामनांत सध्या एकच कल्लोळ सुरु आहे.
ll अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ll