आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील जनतेला ईव्हीएम मशीन बाबत जनजागृती तसेच प्रशिक्षणासाठी शिरोळ तालुक्यातील तहसील कार्यालयात 20 ईव्हीएम मशीन दाखल झाले असून शिरोळ तालुक्यातील गावा – गावात याबाबत जनजागृती तसेच प्रशिक्षण मोहिम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.त्यामुळे प्रशासनाकडून लोकसभेची तयारी सुरू असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. शिरोळ तालुक्यातील कोथळी,कवठेसार,यड्राव, जांभळी, दानोळी या गावात जनजागृती मोहीम संपन्न झाली आहे. उर्वरित गावामध्ये तसेच शहरांमध्ये दोन व्हॅनच्या माध्यमातून मतदारांना ईव्हीएम मशीन बाबत असलेली शंका व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी सदर मोहीम आयोजित करण्यात आली आहे.सदरची मोहीम २९ फेब्रुवारी २०२४ अखेर सुरू राहणार आहे.दरम्यान तहसील कार्यालयातील निवडणूक विभागामध्येही एक मशीन जनजागृतीसाठी ठेवण्यात आले असून आलेल्या पक्षकारांना माहिती देण्याचे काम या ठिकाणी असणारे निवडणूक विभागाचे अव्वल कारकून संदीपान हंगे तसेच कर्मचारी करीत आहेत.सदरची मोहीम मतदान नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, सहायक मतदान अधिकारी तथा तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दीड वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका,नगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत.यातच आता लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सतर्क झाली असल्याचे शिरोळ तालुक्यात दिसून येत आहे.
