शिरोली येथे आठ अज्ञात इसमांकडून तरुणावर हल्ला; कारचे मोठे नुकसान

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे 

 

शिरोली (ता. हातकणंगले) येथील महाडिक पेट्रोल पंपासमोर आठ अज्ञात इसमांनी एका तरुणावर हल्ला करून कारचे मोठे नुकसान केल्याची घटना मंगळवारी (दि. 10 जून 2025) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजवर्धन नितीन हुजरे (वय 29, व्यवसाय, रा. कोल्हापूर) यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी आपल्या मामासोबत शिरोली येथील प्लॉटवर बोअरवेलच्या कामासाठी उभे होते. त्यावेळी एक अज्ञात इसम तेथे लघुशंका करत होता. फिर्यादींच्या मामाने त्यास हटकल्याने त्या इसमाने शिवीगाळ सुरू केली. फिर्यादी हे भांडण थांबवण्यासाठी गेले असता, त्या इसमाने आपले इतर साथीदार बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीला धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली.

 

फिर्यादी आपल्या इंडिगो कार (MH09BX5800) जवळ गेले असता, आरोपीने कारचे दोन्ही आरसे फोडले. तेथून निघून महाडिक पेट्रोल पंपाजवळ पोहचताच, दोन स्कुटीवरून सहा अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना गाडीतून ओढून बाहेर काढले. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करत “हा बाहेरून आलेला आहे, याला सोडायचं नाही,” असे म्हणत गंभीर शिवीगाळ केली.

 

त्यावेळी एका इसमाने दगडाने कारच्या डिक्कीवर मारून नुकसान केले, तर इतरांनी गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून, पोलिसांनी अज्ञात आठ इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मपोहेकॉ शिंदे करीत आहेत.

Spread the love
error: Content is protected !!