स्वाभिमानी संघटनेच्यावतीने शिरोळ पोलीस ठाण्यास निवेदन
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ व परिसरातील युवकांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे.याचा विपरीत परिणाम समाजमनावर होत आहे.यामुळे तात्काळ युवकांमधील वाढत्या गुन्हेगारी व व्यसनाधीनतेवर कठोर कारवाई करावी. अशा मागणीची निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे शिरोळ पोलीस ठाण्याकडे केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून शिरोळ व परिसरात युवकांच्यात किरकोळ कारणावरून मारामारी, जीवघेणे हल्ले, खुनाचा प्रयत्न, तसेच खुनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक युवक गांजा अफीम यासारख्या नशेली अमली पदार्थाच्या आहारी जाऊन नशा करत असल्याचे आढळून येत आहे. त्यातूनच हे युवक गुन्हेगारीकडे वळत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. यामुळे शिरोळ व परिसरात अमली पदार्थांची तस्करी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्याची पाळेमुळे उकरून काढले पाहिजेत. तसेच युवकांच्या मनात कायद्याची भीती राहावी याकरिता कठोर पावले उचलावीत जेणेकरून भारताची भावी पिढी सक्षम व गुन्हेगारीमुक्त राहावी यासाठी प्रयत्न करावेत. अशा आशयाचे निवेदन सचिन सूर्यवंशी यांनी दिले आहे.
शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी सदरचे निवेदन स्वीकारले. त्यांनी या मागणी संदर्भात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.यावेळी माजी उपनगराध्य पै. प्रकाश गावडे, माजी नगरसेवक प्रदीप चव्हाण, उत्तम माळी, प्रकाश माने, साजिद अत्तार आदी उपस्थित होते.