शिरोळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे नाव
शिरोळ / प्रतिनिधी
भारत देशाला कुस्तीच्या माध्यमातून पहिलं ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं भूषण असून महाराष्ट्र शासनाकडून त्यांचं नाव शिरोळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला प्राप्त होणं ही मोठ्या आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे ” असे प्रतिपादन ॲड. श्रीकांत माळकर यांनी केले. ते शिरोळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन नामफलक अनावरण व ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र मा. ॲड .रणजित जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कुलकर्णी पॉवर टूल्सचे व्यवस्थापकीय संचालक मा. नितीन डीसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना ॲड.श्रीकांत माळकर पुढे म्हणाले,” शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा महाराजांच्या ओजस्वी व तेजस्वी इतिहासाचे स्मरण करणे हे आपल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील कर्तृत्व ,नेतृत्व ,संघटन कौशल्य, शिस्तबद्धता,निर्णय क्षमता अशा अनेक पैलूंचे आचरण वैयक्तिक जीवनात करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ऑलिंपिकविर खाशाबा जाधव यांची प्रेरणा घेऊन युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले पाहिजे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. ॲड.रणजित जाधव म्हणाले ” आमचे पिताश्री ऑलिंपिकविर खाशाबा जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष करत व अनेक अडीअडचणीवर मात करून १९५२ मध्ये भारत देशाला कुस्तीच्या माध्यमातून पहिलं ऑलिंपिक पदक मिळवून दिलं.
आज सर्व साधने,सुविधा उपलब्ध असताना यश मिळवणं दुरापास्त बनलं आहे पण त्या काळात खाशाबा जाधव यांनी मिळवलेल्या यशाला खरंच तोड नाही.युवा पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपली भावी वाटचाल करावी.”
कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते मा. अरविंद कुलकर्णी यांनी ” कुटुंब प्रबोधन ” या विषयावर अत्यंत प्रभावीपणे आपले मौलिक विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी या उभयतांच्या हस्ते शिरोळ येथील ” ऑलिंपिकविर खाशाबा जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” या नूतन नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
तसेच या निमित्ताने संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक , क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे
उप -प्राचार्य ए.व्ही. हिरुगडे पवार यांनी केले. प्रास्ताविक एस. व्ही. कांबळे यांनी केले . सूत्रसंचालन अविनाश लोहार यांनी केले. आभार एम.बी.भंडारे यांनी मानले. यावेळी आय.एम.सी. चे सदस्य एम. बी.राजमाने ,सौ. के. एस.नलवडे , शिवाजीराव पाटील कौलवकर ,सौ.लताताई खडके , विविध क्षेत्रातील मान्यवर ,शिक्षक ,प्राध्यापक व विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.