पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
कोल्हापूर परिमंडलात महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर, दि. ०६ जून २०२५ विद्युत अपघात कमी करण्यासाठी विजेबाबत काम करताना सुरक्षितता व साक्षरता महत्वाचा आहे. त्यामुळे शून्य अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून जनजागृतीचे अभियान वर्षभर सुरु ठेवावे, असे महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी सांगितले. कोल्हापूरातील सायबर महाविद्यालयाच्या आनंद भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूर मंडल कार्यालायचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंत्या पुनम रोकडे यांच्यासह सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंते सुनील गवळी, म्हसू मिसाळ, दत्तात्रय भणगे, अजित अस्वले,अशोक जाधव,संजय पवार,विजयकुमार आडके,वैभव गोंदील,सुधाकर जाधव,सागर मारुळकर, निलेश चालिकवार, संगणक प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर परिमंडलातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात “आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रिद घेऊन १ जून ते ६ जून हा सुरक्षा साप्ताह म्हणून राबवण्यात आला. यामध्ये वीज कर्मचारी व अधिकारी यांनी ग्राहक जागृतीकरिता मॅरेथॉन, रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस लाईन स्टाफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या हस्ते केक कट करण्यात आला. यावेळी उपस्थितांना विद्युत सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. त्यांनतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेशाची चित्रफित स्वरुपात दाखण्यात आला. तसेच महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या संदेशाची चित्रफित दाखवण्यात आली. महावितरणने गेल्या २० वर्षात केलेली कामगिरी याचीही चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.
यावेळी बोलताना स्वप्नील काटकर म्हणाले, ‘ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात शेती क्षेत्र जास्त असल्याने अनेक आव्हाने असूनही मागील आर्थिक वर्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. ग्राहकांशी संवाद ठेवत नवीन जोडणी, देयके, देखभाल दुरुस्ती आदी विषयांत चांगले काम केले आहे. वरिष्ठ व्यवस्थापनाचा मानस आहे की, येत्या एक दोन वर्षात महावितरणचा ताळेबंद सुधारून कंपनी फायद्यात आणून, महावितरणचे भविष्यात शेयर मार्केटमध्ये लिस्टिंग व्हावे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निष्ठा पूर्वक प्रामाणिक प्रयत्न केल्यास हे ध्येय अवघड नाही.
यावेळी कोल्हापूर परिमंडलातील अधिकारी – कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकरिता ‘भूपाळी ते भैरवी’ या मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले. सूत्रसंचालन शकील महात यांनी केले तर आभार दत्तात्रय भणगे यांनी मानले. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे अभियंते, कर्मचारी, जनमित्र व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.