शिरोळ / प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शिरोळ तालुक्यात थैमान घातल्याने भाजीपाला तसेच ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक गावांमध्ये शेतांमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला,सोयाबीन,भुईमूग,वांगी,भेंडी यांसारख्या पिके कुजण्याच्या स्थितीत आली आहेत.त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याची माहिती शेतकरी विक्रमसिंह जगदाळे यांनी आज शुक्रवार,दिनांक २३ मे रोजी सकाळी साडे ११ वाजता बोलताना दिली.शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.‘
शेतकऱ्यांनी मशागत, बी-बियाणे व मजुरांवर खर्च करून पिके उभी केली.मात्र,अवकाळी पावसामुळे पाणी साचल्याने ही पिके हातातून निघून जात आहेत, असे ते म्हणाले.तालुक्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक ओढे,नाले साचलेल्या गाळ आणि अतिक्रमणमुळे अडथळले आल्याने शेतात पाणी निचरा होण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तसेच, भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ओढे-नाल्यांची दुरुस्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.