नृसिंहवाडी : दर्शन वडेर
देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला,
दीनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग हरपला,
घेऊन भरारी आभाळापल्याड पतंग सरकला..!
दुःखाचे किती आणि कोणते शब्द व्यक्त करावेत,याची गणतीच मुळात मन विसरून गेले आहे.गुरुजींच्या निधनाची बातमी कळताच मनात अनाहुत भावनांचा कल्लोळ दाटून आलाय. समाजात सहजपणे,प्रेमाने वावरणारा माणूस जेव्हा अचानक निघून जातो तेव्हा सगळ्याच दिशा अंधाऱ्या वाटू लागतात.
आदरणीय गुरुजींच्या श्रद्धांजलीसाठी शब्द लिहितोय,असे अजूनही वाटत नाहीय.त्यांनी उभे केलेले विश्व आताशा कुठे बहरात होते.वटवृक्षाच्या फांद्यांना आता कुठे पालवी फुटत होती आणि अचानक हा वृक्ष उन्मळून पडावा? ईश्वरा,तुझ्या करुणेची
झोळी गुरुजींच्या बाबतीतच का रिकामी ठरावी? हा असा अचानक झालेला आघात सहन न होणारा आहे.सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक,सांस्कृतिक,साहित्यिक,धार्मिक,अध्यात्मिक, क्रीडा,उद्योग,कृषी,राजकारण असाच सर्वच क्षेत्रांचे उत्तुंग
क्षितिज त्यांनी गाठले होते.नृसिंहवाडीचे उपसरपंचपद,दत्त देवस्थानचे अध्यक्षपद त्यांनी यथायोग्य भूषविले.शुद्ध पेयजलाची भाविकांना पूर्तता व्हावी म्हणून त्यांनी पहिल्यांदाच वॉटर एटीएमसारखा अभिनव प्रयोग यशस्वी केला.दत्तराज चॅरिटेबल
ट्रस्टच्या माध्यमातून राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली.वृक्षारोपण,आरोग्य शिबीर, अन्नदान,ध्वजवाटप अशी कितीतरी कामे त्यांची सांगता येतील.
दत्त देवस्थानचे अध्यक्ष असताना कोरोनासारखा अस्वस्थ काळात त्यांनी अगदी योग्य व्यवस्थापन केले.दत्तराज पतसंस्थेने तर संपूर्ण जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.गेली २५ वर्षे दत्तराज परिवाराने भरभरून यश मिळवले.सहकाराचे तत्व
मनाशी रुजवून सर्वसामान्यांचा आर्थिक उद्धार करण्याचे काम गुरुजींच्या नेतृत्वात झाले.अनेक व्याख्याने,प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखली होती.नव्या तंत्रज्ञानाला अंगिकारून आपल्या भागात पतसंस्थेमार्फत डिजिटल व्यवहारांची सुरुवात त्यांनी केली.
प्रत्यक्ष दत्तगुरुंनी ज्यांना आपल्या पादुकांच्या सेवेचे दायित्व दिले,ते पूर्वज भैरंभटांच्या मूळ गावी आलास येथून त्यांनी ‘दत्तराज’च्या शाखाविस्ताराच्या कार्याचा आरंभ केला.पुढे कुरुंदवाड,अकिवाट येथे शाखांचा विस्तार केला.गुरुजींचे वैशिष्ट्य
म्हणजे इतकं सगळं करून देखील त्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. त्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःला या सामाजिक कामांमध्ये झोकून दिले होते.त्यांच्या मनात वाडीच्या विकासाविषयी असणाऱ्या कल्पना अत्युच्च दर्जाच्या होत्या.मात्र त्या आता
अपूर्ण राहतील.गुरुजींचे अतुल्य कार्य हे नृसिंहवाडीच्या इतिहासात अजरामर असणार आहे.पण सर्वसामान्य, गोरगरिबांची हक्काची पतसंस्था आपल्या आधारस्तंभाशिवाय पोरकी झाली आहे.नृसिंहवाडीचा आधारवड काळाच्या पडद्याआड
हरवून गेला आहे.गुरुजींच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी न भरून निघणारी आहे.जगद्नियंत्याच्या मनात हा विचित्र प्रसंग आला तरी कसा असेल? गुरुजी,आम्हांला पोरकं करून जाण्याचं हे तुमचं वय नव्हतं.अजूनही काहीच खरं वाटत
नाहीय…असो! पुजारी कुटुंब आणि दत्तराज परिवारावर
दुःखाचे अस्मान कोसळले आहे.त्यांना यातून सावरण्यासाठी दत्तप्रभू शक्ती देतीलच मात्र वाडीकर म्हणून आम्ही सगळेच जण आपल्या दुःखात शोकाकुल आहोत.स्व.अशोक पुजारी गुरुजींच्या आत्म्यास सद्गती लाभो,ही ईश्वरचरणी प्रार्थना!
अखेरचा हा तुम्हां दंडवत!