शिरोळ / प्रतिनिधी
हरोली (ता शिरोळ) येथे पाण्याच्या आणि महिलेकडे बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत विजय एकनाथ मुघलखूडे (वय अंदाजे ४६ वर्षे) रा हरोली यांचा खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की. हरोली येथील माळभाग येथे सोमवारी सायंकाळी बोअरचे पाणी व महिलेकडे बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यातील संशयित ऋषिकेश उर्फ बाळू गुजरे याच्या घराजवळ महिलेकडे बघण्याच्या जाब विचारण्यासाठी गेलेल्या विजय मुघलखुडे, व अजय कांबळे या दोघांनी गुजरे यास मारहाण करण्यास सुरुवात केली असता.गुजरे यांनी घरात जाऊन धारदार शस्त्र आणून मुघलखुडे व कांबळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विजय मुघलखूडे हे गंभीर तर अजय कांबळे जखमी झाले. जखमीना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान विजय मुघलखुडे यांचा मृत्यू झाला. तर जखमी अजय कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर काहींनी संशयित गुजरे यांच्या घरावर दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान या घटनेनंतर संशयित गुजरे याचे आई-वडील व पत्नी शिरोळ पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले आहेत. दरम्यान रात्री उशिरा घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत आणि कोल्हापूर येथील गुन्हा अन्वेषण पथकाने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यातील संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. तर शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक सांगली शासकीय रुग्णालयात या घटने संदर्भात माहिती घेण्यासाठी रवाना झाले होते. या घटनेनंतर हरोली गावात खळबळ माजली आहे. गावात तणावपूर्ण वातावरण बनले आहे. संशयित गुजरे याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास करीत होते.