कुरुंदवाड / प्रतिनिधी
गोठणपूर परिसरातील इयत्ता दहावी, बारावी तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षांमध्ये विशेष गुण प्राप्त करून प्राविण्य मिळवलेल्या ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा परिसरातील नागरिकांच्या वतीने नुकताच गुणगौरव करण्यात आला.
येथील पिरान-पीर बडेनालसाहेब दर्गाह प्रांगणात गुण-गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसो असंगे होते.प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय जयराम पाटील होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तानाजी आलासे,प्रा. विजयकुमार माने, सचिन मोहिते व प्रवीण खबाले आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना शहराध्यक्ष पाटील म्हणाले, “दहावी व बारावी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. गोठणपूरसारख्या भागातील विद्यार्थ्यांनी कोणतीही खासगी क्लासेस न करता प्राविण्यासह उत्तीर्ण होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. या गुणवंतांमधून भविष्यात अधिकारी घडतील, असा विश्वास वाटतो.”
या कार्यक्रमात विशेष गौरवकार्य म्हणून, गोठणपूर येथील आणि सध्या कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त झालेल्या बिस्मित बंडगर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात श्री. बंडगर म्हणाले, “गोठणपूरची ओळख एकेकाळी गोठ्याचा गाव म्हणून होती. मात्र गेल्या काही वर्षांत येथील युवक व विद्यार्थ्यांनी ही ओळख बदलण्यासाठी सतत प्रयत्न केले. यावर्षी विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी त्या प्रयत्नांना यश मिळवून दिले आहे. मीही या परिसरातून घडलो आहे आणि या गुणवंतांच्या पाठीशी त्यांच्या मोठ्या भावाप्रमाणे कायम उभा राहीन असे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे, सर्जेराव बागडी, तानाजी आलासे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष साताप्पा बागडी, जितेंद्र साळुंखे, हरिदास शेडबाळे, महेश आलासे, किरण खराडे, विनायक कोरे यांच्यासह परिसरातील नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.