तमदलगे / प्रतिनिधी
तमदलगेसह सात गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या पाझर तलावातून गेल्या दोन दिवसांपासून पाणी मोठ्या प्रमाणावर गायब होत आहे.तलावात अनेक ठिकाणी बुडबुडे येऊन पाणी मोठ्या प्रमाणावर जमिनीत मुरत असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.बुडबुडे येऊन जमिनीत मोठ्या प्रमाणावर मुरणारे पाणी नेमके चालले कोठे याचा अंदाज लावणेही कठीण बनले आहे.जवळपास सात गावांचे जलसाठे या पाझर तलावावर अवलंबून असल्याने लाभक्षेत्रातील गावांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.१९७२ पासून प्रथमच असा प्रकार घडल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर हा प्रकार घडू लागला आहे. शिरोळचे तत्कालीन आमदार व मंत्री स्व.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुढाकारातून पाझर तलाव आकारास आला.तलावाचे पाणी तमदलगे,निमशिरगाव,कोंडीग्रे, जैनापूर,चिपरी,मजले, कुंभोज गावातील जलस्त्रोत वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.२०१४-१९ या काळात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तलाव काहीसे संवर्धनाच्यादृष्टीने उपाययोजना राबविण्यात आले. यानंतर मात्र तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाने पाठ फिरवली.तलावातून पाणी उपशाला बंदी आहे.तलावातून बाहेर पडणारे पाणी एका विहिरीत साठवून त्याचा उपसा केला जातो.यातून गावाची तहान भागते तर तलावानजीक डोंगराळ भाग असल्याने जनावरे चरून तलावाचे पाणी पितात तर पशुपक्ष्यांना देखील तलावाचा मोठा आधार आहे.तलावाच्या परिसरात असणाऱ्या डोंगराळ भागात पर्यटक आणि ट्रेकर्सची मोठी वर्दळ असते.सध्या संरक्षित बांधावरून वाहतूक सुरू आहे.यामुळे जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.झाडेझुडपे उगवल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे.अनेक झाडे वाऱ्याने उन्मळून पडली.गेल्या दोन दिवसांपासून तलावातून अनेक ठिकाणी बुडबुडे येऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू आहे.मात्र हे पाणी नेमके जाते कुठे याचा अंदाज लावणे कठीण बनले आहे.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून पाटबंधारे विभागाला याबाबत कळविले आहे.मात्र पाटबंधारे विभागाकडून गंभीर प्रकाराची साधी पाहणी देखील करण्यात आली नाही.तमदलगे गावात पर्जन्यमान अधिक असल्याने अतिवृष्टीच्या काळात तलावात मुबलक पाणीसाठा निर्माण होतो.सध्या तलावाला लागलेली गळती धोक्याची घंटा आहे.तलाव कमकुवत होत आहे.बांध फुटल्यास अनेक घरे आणि शेतींना धोका निर्माण होऊ शकतो.तर शंभर टक्के दुष्काळी गावांमध्ये गावची नोंद होऊ शकते.