अलमट्टी धरण उंची वाढीविरोधात चक्काजाम होणारच : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची भूमिका
शिरोळ / प्रतिनिधी
आंदोलकांच्या भावना पोलीस प्रशासनाच्यावतीने नेहमीच संबंधित विभाग व वरिष्ठांना कळविण्यात आल्या आहेत. रविवारी सर्वपक्षीय होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये याची आंदोलकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी केले. अलमट्टी धरण उंची वाढीमुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसणार आहे. प्रशासनाने तात्काळ अलमट्टी धरण उंची वाढ रद्द करण्यासाठी व शासनाला जागे करण्याकरिता रविवारचे चक्काजाम आंदोलन होणारच अशी भूमिका सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मांडली.
अलमट्टी धरण उंची वाढी विरोधात सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने रविवारी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बोलताना पोलीस उपाधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके म्हणाल्या की आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत असतो याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांना येण्या जाण्यासाठी एखादा मार्ग मोकळा ठेवण्यात यावा. आंदोलकांच्या भावना आम्ही वेळोवेळी वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. आजच्या बैठकीत आपण मांडलेले भूमिका वरिष्ठापर्यंत पोहोचवले जातील असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मादनाईक, आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, दरगू गावडे, रयत क्रांती संघटनेचे शहाजी गावडे यांनी आपली भूमिका मांडत असताना अलमट्टी धरणामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. या धरणाची उंची वाढली तर नेहमीच महापुराचा सामना जनतेला करावा लागणार आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढ रद्द करावी याकरिता शासनाने प्रयत्न करावेत. यासाठीच रविवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, यांनीही आपले मत व्यक्त केले. या बैठकीस स्वाभिमानीचे सचिन शिंदे, रावसाहेब आलासे, आंबेडकर चळवळीचे अनिल लोंढे, संदीप बिरणगे, किरण भोसले, रमेश शिंदे, संजय शिंदे, दिनेश कांबळे, विक्रम माने, अनिल मादनाईक, बाळासो कांबळे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.