शिरोळ / प्रतिनिधी
राज्यातील नगर भूमापन कार्यालयातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन करत असून, याचा परिणाम थेट नागरिकांवर होत आहे. शिरोळ तालुक्यातील नगर भूमापन कार्यालयातही कर्मचाऱ्यांनी कामकाज ठप्प केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या विविध कामांमध्ये खोळंबा निर्माण झाला आहे.
शासनाकडून नियमित वेतनवाढ, जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरून कामाचा ताण कमी करणे, सेवांतर्गत सवलती लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील नगर भूमापन कार्यालयात दररोज होणारे जमीन मोजणी, सातबारा उतारे, सीमा निशाण, नोंदणी व इतर सर्व कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
नगर भूमापन कर्मचारी संघटनेने सरकारच्या उदासीन धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारने वेळेवर निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या विविध योजना अडकून पडल्या आहेत. नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे, दाखले मिळण्यात विलंब होतो आहे, परिणामी अनेक कामे रखडली आहेत.
नागरिकांनी देखील प्रशासनाकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. शिरोळ तालुक्यातील या कामबंद आंदोलनामुळे नागरी सेवांवर मोठा परिणाम झालेला असून, लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.